एका प्रयोगशील शिक्षिकेला देवाज्ञा !
लीला ताईचा सहवास मला प्रत्यक्ष कधीच लाभला नाही. पण त्या पुस्तकरूपाने कायम माझ्या सोबत होत्या व आहेत. जसं शिक्षणातील काही प्रयोग करू हा विचार सुरू झाला. तसे अनेक शिक्षणतज्ञ वाचण्यात आले. त्यात लीलाताईचं नाव अग्रस्थानवर.

लीलाताईची शाळा सृजनआनंद विद्यालय कोल्हापूर येथे आहे. आताच्या शाळा म्हंटल तर हजारो पटसंख्या उंच उंच इमारती असं चित्र डोळ्यासमोर उभं राहत.पण लीलाताईची शाळा तशी चारच वर्गखोल्याची , मराठी माध्यमाची , प्रत्येक वर्गात मोजके विद्यार्थी असणारी शाळा . पण लीलाताई व त्यांच्या सहकार्यांनी या शाळेत मुलांसोबतचे केलेलं प्रयोग त्यांनी अनेक पुस्तकरूपाने जगासमोर आणले. व शिक्षणातील नव्या संकल्पना जगाला दिल्या.
3 री व ४ थी च्या मुलांची भुताची भीती दूर व्हावी यासाठी त्यांनी काढलेली स्मशान भूमीची सहल असो , किंवा कातडे कमावणे म्हणजे काय हे सांगण्यासाठी चांभाराच्या दुकानाला भेट असो प्रकल्प , क्षेत्रभेटी व अनुभव शिक्षण याचे शेकडो प्रयोग लीलाताईनी केले.
मी कोल्हापूरात ग्रामीण भागात काम सुरू केल्यावर मागील २-३ वर्षात बऱ्याच वेळा सृजन आनंद शाळेला भेट दिली. सद्या लीलाताई शाळेत येत नाहीत. असं तेथील ताई मला एकदा बोलल्या. पण लीलाताईनी तयार केलेली दुसरी फळी सुचेता ताई , गायत्री ताई असे कितीतरी ताई व दादा शाळेमध्ये आहेत.जे लीलाताईनी केलेल्या प्रयोगावर समाधान न मानता. दररोज शाळेत नवीन काही व्हायला हवा असा प्रयत्न करतात. तेव्हा लीलाताईची प्रयोगशिलता पुढच्या फळीत सहज पाहायला मिळते.हे सगळं श्रेय सहाजिक लीलाताईनाचं जात.
लीलाताई जगाला सोडून गेल्या तरी त्यांनी शिक्षणात करून ठेवलेल काम पुढच्या अनेक पिढ्याना उपयोगी ठरणार आहे. लीलाताईच्या आत्मास शांती लाभो !
विनायक माळी
16/06/2020
अब्दुल लाट, इचलकरंजी
https://www.esakal.com/sampadakiya/article-lilatai-patil-308418