12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन त्यानिमित्त….
स्वामी विवेकानंदाच्या डायरीत एक वाक्य लिहलं होतं.
“४ जून १८९२ मी या जगाचा निरोप घेईन, पण माझ्या विचारांच्या प्रेरणेतून हजारो विवेकानंद तयार होतील. आणि तेच राष्ट्राचा उद्धार करतील.”
स्वामी विवेकानंदाच्या विचारातून ‘ आपण समाजाचे काही देणं लागतो. काहीतरी केलं पाहिजे. मला जे काही शिकता आले , समजले, ते इतरांपर्यंत पोहचले पाहिजे आणि मला जे नाही मिळाले तेही इतरांना पर्यंत पोहचलं पाहिजे ‘, हा ध्यास घेवून, पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा आदर्श घेवून ‘ खेडयाकडे परत गेलं पाहिजे, बालक हीच देशाची खरी संपत्ती आहे. त्यांची गुणवत्ता हेच त्या देशाचे उज्ज्वल भविष्याचे मर्म असते…!’ हेच शिक्षणातील मर्म ओळखून स्वामी विवेकांदाच्या शिक्षण विषयक विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी ‘राष्ट्र उभारणीच्या क्षमता निर्माण करणारे शिक्षण ……!!!’ हे ब्रीद वाक्य घेवून “ विद्योदय ” नावाची एक युवक संघटना आम्ही काही ध्येयवेड्या मित्रांनी सुरु केली आहे.
आमच्या हातात काही भांवडल नाही की स्वतःची जागा नाही, पण आहे फक्त धडपडण्याची जिद्द, प्रामणिक प्रयत्न, आपल्या भागात शिक्षणातील गुणवत्ता वाढवण्याची इच्छाशक्ती याच बळावर आम्ही रुकडी (कोल्हापूर) या ग्रामीण भागात या एका अनौपचारिक केंदाचे उद्घाटन आमच्या काही गुरुजनाच्या,पालकांच्या अमृत हस्ते या युवा दिना निमित्त केले. व शिक्षणातील पसरलेला अंधार दूर करण्यासाठी विद्येचा नवा उदय घेवून अनेक स्वच्छ, तेजस्वी किरणं एकत्र आणून विदयेच्या प्रकाशात हे जग अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिज्ञा आम्ही केली आहे.
महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर ,सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात व्यक्तिमत्व विकास, मुल्य शिक्षण, जीवन कौशल्य ,पालक प्रबोधन, शिक्षक प्रबोधन, विज्ञान प्रसार, वाचन संस्कार, युवक जागृती, व्यवसाय शिक्षण हे तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी पर्यत पोहोचण्याचा उद्देश घेवून सामाजिक जबाबदारीचे भान असलेले व गुणवत्तेची जाण असलेले नागरिक तयार करावेत व सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण कार्य उभारण्याचे स्वप्न हे विद्योदयच्या माध्यमातून पाहत आहे.
यासाठी हवे आहेत आपणा सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद व पाठीवरती हात ठेवून ‘फक्त लढ’ म्हणणारी माणसे !
ती नक्कीच मिळतील याची मला खात्री आहे.