३ वर्षे पूर्ण होताना ..
युवा दिनाच्या शुभेच्छा !!!
जर एखादं काम तीन वर्षे तुम्ही जिद्दीने सुरु ठेवलं तर ते काम पुढील अनेक वर्षे चालू राहील असा अलिखित नियम आहे. आणि हो, विद्योदय मुक्तांगण परिवाराला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. १२ जानेवारी २०१६ ला रुजवलेल्या बी ला आता पालवी फुटू लागली आहे. गेल्या वर्षीचा कामाचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवावा यासाठी हा लेखन प्रपंच..
गेल्या ३ वर्षात आम्ही काय गमावले व काय कमावले यापेक्षा अर्थपूर्ण जीवनाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास धीम्या गतीने चालू ठेवला आहे. या तीन वर्षात खूप नवी माणसे जोडली गेली. या जोडलेल्या माणसाची नाती ही जमली, तर काही जवळची माणसे आपल्या वाटेने निघूनही गेली. काही कौटुंबिक जबाबदारी पूर्ण केल्या व स्वत: नवीन वर्षाच्या सुरवातीला मी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.
विद्योदयच्या मागील वर्षाच्या कामाच्या आढावा पुढील प्रमाणे –
रविवारच्या कौशल्य शाळा – सध्या रुकडी, अब्दुल लाट प्रमाणे इचलकरंजी भागातही यंत्रमाग कामगारच्या मुलांसाठी रविवारची कौशल्य शाळा सुरु झाली शिवाय कराड भागात तीन शाळांमध्ये रविवारची कौशल्य शाळा हा उपक्रम सुरु झाला. उमेद फौडेशन द्वारा ज्ञानसेतू या नावाने सांगरूळ भागात रविवार कौशल्य शाळा हा उपक्रम सुरु झाला. एकूण २०० विद्यार्थी या उक्रमाचा लाभ घेत आहेत.
हस्ताक्षर सुधार अभियान – कराड व कोल्हापूर , पुणे, बारामती या भागात १०० हून अधिक शाळांमध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या. २५००० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
युवा चेतना शिबीर – ४ थे जिल्हास्तरीय युवा चेतना शिबीर इचलकरंजी येथे शिबीर संपन्न झाले. त्यात कोल्हापूर व सांगली मधील ६० युवकांनी याचा लाभ घेतला व आपापल्या ठिकाणी कामाची सुरुवात केली.
बालसंस्कार शिबीर – बालोद्यान या अब्दुल लाट मधील अनाथाश्रमात या दिवाळीच्या सुट्टीत बालसंस्कार शिबिराची नव्याची सुरुवात केली. बालोद्यान व परिसरातील ५० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.शिवम प्रतिष्ठान च्या विविध जिल्ह्यातील जबाबदारी देण्यात आली आहे.
पथनाट्य प्रबोधन – अब्दुल लाट व इचलकरंजी केंद्रातील मुलांनी एकत्रित मिळून ४७ पथनाट्याचे प्रयोग कोल्हापूर जिल्हातील शिरोळ व इचलकरंजी परिसरातील विविध गावात सादर केले. दहा हजार लोकांपर्यंत विविध सामजिक विषयाचे संदेश या मार्फत पोचले..
वृक्षारोपण – हिरा फौंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत अब्दुल लाट केंद्रातील मुलांनी सहभाग घेतला.
ग्रामीण शिक्षा परिवर्तन (GSP) फेलोशिप – शिरदवाड गावातील दोन जिल्हा परिषद शाळेबरोबर वर्षाभरासाठी GSP कार्यक्रम सुरु आहे.यात ६ वी ७ ची ४० मुले या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत.
सेवांकुर साखर शाळा – गेली २ वर्षाच्या अनुभवावर या वर्षी ५ ठिकाणी साखर शाळेची केंद्रे सुरु करण्यात आली आहे. सध्या ७० मुले या केद्राच्या माध्यमातून शिकण्याची गोडी टिकवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
डी. एड. च्या अभ्यासक्रमात उल्लेख – विद्योदयच्या कामाची दखल डी. एड. च्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘उपक्रमशील संस्था’ या प्रकरणात करण्यात आला आहे.
सिद्धगिरी जिज्ञासा संचारिका – प.पु काडसिद्धेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व मह्सूल मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आर्थिक सहयोगाने फिरती विज्ञान प्रयोग शाळा बनवून देण्यात आली. हे विज्ञान शाळा २०० जिल्हा परिषद शाळांबरोबर काम करणार आहे.
गुरुजन ह्र्दय संमेलन २ रे – माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख साहेब याच्या मार्गदर्शनाखाली २५० शिक्षणाचे निवासी शिबीर आयोजन करण्यात आले.
मागील वर्षाचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवला आहे. आपल्या सहकार्याची व प्रेरणेची गरज आहे.
अजून बराच पल्ला गाठायचा आहे. एक बिन पगारी पूर्ण वेळ कार्यकर्ता ( बायको) रुजू झाला आहे.
आपल्या सर्वाची साथ मोलाची..
विद्योद्य मुक्तांगण परिवार